Thursday, March 29, 2012

तेथे कर माझे जुळती !

वसंत - विषुवा नंतरचा पहिलाच दिवस २१ मार्च २०१२. सूर्य अस्तास गेलेला. एका तडफडणाऱ्या  राजर्षीची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. कारवारचे सुपुत्र शरद नागेश सलगर कालावश झाले.

कारवार तालुक्यातील सदाशिवगड ह्या छोट्याश्या गावातील मुख्याध्यापकांच्या कुटुंबात ७ जानेवारी १९४ रोजी त्यांचा जन्म झाला. सात अपत्यांपैकी एक असल्यामुळे, आपल्या गुणवत्तेच्या जोरावर लक्ष्मीची उणीव सरस्वतीने भरून काढत त्यांनी मुंबईत पदार्पण केले. मुंबईत जीवाचे पाणी करून घरापासून  ११  वर्षे लांब राहून त्यांनी B. Com, LLB, CA पर्यंत मजल मारीत  त्यांनी फर्ग्युसन व एस्सो सारख्या कंपन्यामध्ये नोकरी करून लग्नानंतर  झेप घेतली ती सरळ आफ्रिकेकडे.


महत्वाकान्क्षी वृत्ती, मनमिळाऊ स्वभाव, अविरत अथक प्रयत्न करण्याची सवय आणि प्रसन्न उदार मनाने माणसे जोडण्याची आवड ह्या कर्तृत्वगुणामुळे त्यांची कीर्ती आणि यश सतत वृध्धींगत होत गेले.

कोकणात जन्मलेल्या आणि कोंकणी माणसात वाढलेल्या ह्या अष्टपैलू व्यक्तीने  मराठी, गुजराथी, कन्नड, पंजाबी, हिंदी ह्या भाषा अश्या काय आत्मसात  केल्या कि 'सलगर' हे आडनांव भारतातील कुठल्या प्रांतात प्रचलित आहे याचे भल्या भल्यांना कोडे पडावे. इंग्रजी तर इंग्रजाला पण  लाजविणारी अन वक्तृत्वाची वैजयंती तासनतास मुग्ध करीत ठेवणारी.


सफल कारकीर्दीच्या झपाट्यामध्ये त्यांनी क्रीडाक्षेत्रातील आपली आवड पण तळहातावर जपली अन जोपासली. "गोल्फ" सारख्या गोऱ्यांच्या महागड्या साधन संपन्न खेळामध्ये सरशी वर सरशी मिळवत त्यांनी कित्येक पदके व सन्मान पटकावले, जीवाभावाचे मित्र जोडले व यशाचा मार्ग सुकर केला . क्रिकेट सामना ऐकण्या-पहाण्याची संधी कधी गमावली नाही, अन विश्वचषक फुटबॉल साठी चक्क दक्षिण आफ्रिकेची वारी केली.

ज्या उद्योगक समूहाने त्यांना पाठपुरावा करून वर आणल त्या समूहाला तर त्यांनी भरभरून कित्येक पट फायदा करून देत परतफेड केलीच, पण त्याहून अधिक म्हणजे ज्या टांझानिया सारख्या छोट्या देशाच्या भूमीने त्यांना दिग्विजयाची संधी दिली त्या देशाच्या बांधवांसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. त्यांच्या Confederation of  Industries  चे  नेतृत्व करून देशाला वाणिज्य/व्यापार क्षेत्रात अग्रेसर केले. काणकूणच्या जागतिक व्यासपीठावर त्यांच्या शिष्ट मंडळाचे नेतृत्व करीत भारतीय अस्मितेची ग्वाही दशदिशांना दिली.

एवढ सगळ करत असतांना त्यांनी  जगातील सर्व प्रकारच्या शाकाहारी तसेच मांसाहारी व्यंजनांचा आस्वाद घेण्याचा आपला व्यासंग जोपासला. ह्या कल्पवृक्षाची छाया तर त्यांच्या कुटुंबियांना मिळालीच, परंतु समाजकार्यासाठी पण त्यांनी उदार  हातांनी मदत केली. चांगल्या कार्यासाठी स्वतः तर हातभार लावलाच, पण ईतर अनेकांना प्रोत्साहित करत कामाला वेग दिला.

नायजेरिया मध्ये वास्तव्य असतांना अनेक नायजेरिया वासियांनी त्यांना चीफ म्हणजे नायक ही पदवी स्वीकारण्यासाठी गळ घातली होती. पण त्यांनी ती स्वीकारली नाही. आफ्रिकेच्या ह्या अनभिषिक्त राजकुमाराला अश्या खिताबांची काय गरज होती ?

अश्या ह्या भव्य दिव्य आयुष्यावर बोलण्यासाठी शब्दच अपुरे पडतात, ओठामधून एकच उद्गार निघतात .........
 -----  तेथे कर माझे जुळती ! 

Followers